संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या दर्शना पवार हत्याकांडाचा आता संपूर्ण उलगडा झाला आहे. दर्शनाच्या मित्रानेच तिचा खून केला असल्याचे उघड झाले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्या मित्राचे नाव राहूल हंडोरे असून त्याच्याकडून प्राथमिक तपासात बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
राहुल हंडोरे व दर्शना पवार यांची ओळख लहानपणा पासूनच होती. राहुल हा दर्शनाच्या मामाच्या गावातील असून त्याचे घर दर्शनाच्या मामाच्या घरा समोरच होते. नंतर गेल्या 5-6 वर्षापासून ते एकत्र एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होते. काही दिवसापूर्वी एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला व त्यात दर्शना पवार ही राज्यात तिसरी आली व राहुल याला अपयश आले.
पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार करण्यात येणार होता व त्यासाठी ती 9 जून रोजी पुण्यात आली होती. 12 जून रोजी ती सिंहगड किल्ल्यावर जात आहे असे घरच्यांना सांगितले. किल्ल्यावर जाताना राहुल सोबतच होता. 12 जून नंतर दर्शनाचा मोबाईल बंद येत असल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
तपास करीत असताना राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. शवविच्छेदन केल्यानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले व राहुलचा तपास सुरू झाला होता. राहुल मुंबईत असल्याचे पोलिसांना समजले व पोलिसांनी सापळा रचत राहुल याला अंधेरी रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. राहुलच्या प्राथमिक तपासात दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.