पावसाळा सुरू झाला की आस लागते ती श्रावण महिन्याची. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्वाचे स्थान देण्यात येते. या महिन्यात महादेवाचे पूजन, नामस्मरण, उपासना या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. परंतु, या वर्षी श्रावण हा एक महिन्याचा की 2 महिन्यांचा हा संभ्रम निर्माण झाला आहे.
श्रावण महिना सुरू होण्या अगोदर वातावरणात सगळीकडे थंडावा आलेला असतो. जिकडे पाहावे तिकडे नदी, तलाव दुथडी भरून वाहत असतात. श्रावणात हिंदू धर्मातील संस्कृती, परंपरा, सण – उत्सव सर्व काही उत्साहात साजरा करण्यात येतो. महादेवांना श्रावण महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगण्यात येते. परंतु, यावेळेस महादेव भक्तांना 1 नव्हे तर 2 महिने शिवभक्ती करण्याची संधी मिळणार आहे.
यावर्षी अधिक मास आल्याने तब्बल 59 दिवसाचा श्रावण महिना असणार आहे. हा शुभ संयोग 19 वर्षानंतर घडणार आहे. येत्या 18 जुलै 2023 पासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असून तो 15 सप्टेंबर ला संपणार आहे. श्रावण जरी 2 महिन्यांचा असला तरी उपवासाचे सोमवार 4 आहेत. त्यात 21 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, 11 सप्टेंबर हे सोमवार आहेत.
तसेच, श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करण्यात येते. हे व्रत नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच नवविवाहित महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते व त्यानंतर रात्री मंगळागौर केले जाते. त्यावेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे.